आमदार योगेश टिळेकर यांचे मामा यांची अपहरण करून हत्या

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

पुणे :- भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत यवत गावाच्या परिसरात त्यांचा मृतदेह सापडला आहे.

सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीतून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घालत त्यांचं अपहरण केलं होतं. संबंधित घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली असून घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला होता.

सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक एक गाडी आली. या गाडीतून दोन अज्ञात आरोपी बाहेर आले व त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचीत करण्याचं नाटक करत त्यांना बळजबरीनं गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता याचा तपास करताना अचानक सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.

सतीश वाघ रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव असून ते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. अपहरण व हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप या हत्या प्रकरणाचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.

error: Content is protected !!