सौ.जयश्री तांबे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

फलटण:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या उपशिक्षिका सौ.जयश्री गणेश तांबे यांची किशोरवयीन विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये संवर्धन- एक चळवळ या विषयावर सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

भाषेतील भाषिक कौशल्ये ही श्रवण,भाषण,वाचन,लेखन या प्रक्रियेतून जात असताना भाषेचा प्रभाव सर्वांवर होण्याकरता वरील भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने येणे गरजेचे आहे. किशोरवयीन मुलांचा वयोगट हा बालपण व तारुण्य या दरम्यानचा महत्वाचा समजला जाणारा वयोगट असतो.किशोरवयीन अवस्थेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असताना शारीरिक विकासाबरोबर भावनिक व मानसिक विकास होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य सवयी लावल्या तर निश्चितच ते उपयुक्त ठरणार आहे. सौ.जयश्री तांबे ह्या उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जात असून त्याशाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात यामध्ये प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन व त्यांचे समीक्षण करणे, बुके ऐवजी बुक देणे,संमेलन भेट,ग्रंथ प्रदर्शन भेट,हरिपाठ ,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,श्री समर्थ मंडळ सातारा परीक्षा, पुस्तकांचे पारायण,भाषिक खेळ, विविध कार्यक्रमा प्रसंगी पुस्तक भेट इत्यादी उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल झाल्याचे दिसून आले व त्यांच्यात वाचण्याची गोडी निर्माण झाली. त्यामुळे वकृत्व व निबंध स्पर्धेत विद्यार्थी यश संपादन करू लागले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम संपूर्ण शाळेमध्ये किशोरवयीन वयोगटांमध्ये राबवला जात असून या उपक्रमाची प्रेरणा घेऊन इतर शाळेतील विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होताना दिसून आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या महावाचन चळवळ या राज्य शासनाच्या उपक्रमामध्येही या नवोपक्रमातील काही घटकांचा समावेश झालेला आहे.सदरचा उपक्रम हा केवळ राबवायचा म्हणून राबवला नसून तो एक काळाची गरज बनली आहे आणि तो दरवर्षी राबवला शाळेमध्ये राबवला जाणार असल्याचे मत सौ.जयश्री तांबे यांनी व्यक्त केले. त्यांनी या निवडीचे सर्व श्रेय संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग व शाळेतील सहकारी शिक्षक , पालक व विद्यार्थी यांना दिले आहे.

त्यांच्या या यशाबद्द्ल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले,संस्थेच्या सेक्रेटरी मधुबाला भोसले, संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, डाएटचे प्राचार्य डॉ.अमोल डोंबाळे, गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ ,अधिव्याख्याता डॉ.सतीश फरांदे सर , अन्नपूर्णा माळी, कृष्णात फडतरे, गट समन्वय दमयंती कुंभार ,प्रशासकीय अधिकारी स्वाती फुले, प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश पाठक, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक धन्यकुमार तारळकर, तसेच सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थी यांनी त्यांच्या निवडीबद्दल कौतुक केले आहे व राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!