फलटण l दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी लग्न लावून फलटण येथील लग्न न झालेल्या फिर्यादी शेतकरी नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश करत फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. नवरदेवाची आर्थिक लुट करणाऱ्या या पाच आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील शेतकरी असलेल्या एका ४४ वर्षीय फिर्यादीचे लग्न जमत नव्हते. बट्ट गोरे (रा. कुरवली ता. फलटण) या ओळखीच्या माणसाने फिर्यादींना छाया साठे हिचा नंबर देऊन ती लग्न जुळवण्याचे काम करत असल्याचे फिर्यादीस सांगितले असता फिर्यादीने छाया साठे या महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर छाया साठे व तिची साथीदार जयश्री शिंदे यांनी संगनमत करुन दोन मुले असलेल्या दिपाली जाणे या महिलेशी फिर्यादीचे आळंदी येथे लग्न लावून दिले.

त्यावेळी त्यांनी फिर्यादीकडून २ लाख ७५ हजार रुपये घेतले. लग्नानंतर मात्र दिपाली जाणे ही सहा दिवसांतच फिर्यादीस आपल्याला दोन मुले असल्याचे सांगून निघून गेली.त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने जयश्री शिंदे व छाया साठे यांच्याकडे दिलेले पैसे परत मागितले. त्यावर या दोघींनी त्यांना दुसरी मुलगी दाखवते, असे सांगून त्याकरता दीड लाख रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर दि. २७ जानेवारी रोजी जयश्री शिंदे या शशिकला जाधव हिला नवरी मुलगी म्हणून फलटण एसटी स्टँडवर घेऊन आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गजानन डाखोरे, सुमित्रा डाखोरे व गोकुळ लोंढे हे होते. मात्र संबंधित व्यक्ती नवरी मुलीचे नातेवाईक असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने ही बाब फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना सांगितली.
यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणी जयश्री दत्तू शिंदे (रा. चिखली डाखोरे, ता. हवेली, जि. पुणे), शशिकला तुकाराम जाधव (रा. चिखली ता. मंगळरूपीर, जि. वाशिम), सुमित्रा गजानन डाखोरे, गजानन नामदेव डाखोरे, गोकुळ ज्ञानदेव लोंढे (तिघे रा. तांदूळवाडी ता.जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली, तर दिपाली प्रभू जाणे (रा. पाटणादेवीरोड, रोशननगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) व छाया साठे (रा. आळंदी जि. पुणे) या दोघी पसार झाल्या.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत असून या टोळीकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.