वाई:- वाई, गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीतील कर्मचारी यांच्या कुटुंबातील महिलांसाठी मोफत आरोग्य, कर्करोग इ. तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.

गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने कंपनीतील कर्मचारी यांच्या कुटुंबातील महिलांसाठी दरवर्षी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येते. याचे औचित्यसाधून ऑन्को केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने महिलांसाठी मोफत आरोग्य व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर चे विभाग प्रमुख डॉ अर्जुन शिंदे, डॉ मनीषा मगर, युनिअनचे अध्यक्ष संजय म्हस्के, सेक्रेटरी अर्जुन सावंत, कुमार पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.यावेळी डॉ मनीषा मगर यांनी कर्कराेगा विषयी सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने आयाेजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. आपल्या कामगारांबराेबर त्यांच्या घरच्यांच्या आराेग्याची तपासणी करणे ही काैतुकास्पद बाब आहे. या कंपनीचा सर्वांनी आदर्श घ्यावा. त्या पुढे म्हणाल्या, नियमित तपासणी चाचण्या घेणे हा स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, जेव्हा तो लहान असतो, पसरलेला नसतो आणि त्यावर उपचार करणे सोपे असू शकते. तसेच रुग्णांना ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर येते मोफत वैद्यकीय चाचणी आणि उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या शिबिरात ११५ लाभार्थ्यांनी मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. यावेळी ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर चे विभाग प्रमुख डॉ अर्जुन शिंदे, डॉ मनीषा मगर आणि त्याची संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. सुरभी जमदाडे हिने सूत्रसंचालन केले. प्राजक्ता कानिटकर, दिपाली सदाफुले, दुधाने यांनी महिलांसाठी संगीत खुर्ची व प्रश्नमंजुषा हे खेळ घेतले. विजेत्या स्पर्धकांना मान्यचरांच्या हस्ते बक्षिस देऊन गाैरविण्यात आले. कुमार पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास कामगारांच्या घरातील महिला माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या. यावेळी सर्व महिलांना हळदीकुंकू देऊन भेटवस्तू देण्यात आली.