शासनाने शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे, महावितरणने जुन्या पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन द्यावे : स्वप्निल गायकवाड

वाई:- महाराष्ट्र शासनाकडून तसेच महावितरण कडून शेतकऱ्यांचे शोषण होत असून ते तत्काळ थांबवावे व महावितरणने जुन्या पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन द्यावे अशी मागणी स्वप्निल गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले असून स्वप्निल गायकवाड यांनी याविषयी बोलताना सांगितले की, महावितरण कडून काही महिन्यांपूर्वी शेती पंपांसाठी देण्यात येणारे नवीन कनेक्शन हे बंद करण्यात आले आहे त्याला पर्याय म्हणून आता शेतकऱ्यांना थेट सौर उर्जेवर चालणारे ७.५ एचपी पर्यंतच कनेक्शन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र हा निर्णय घेत असताना या निर्णयामुळे होणाऱ्या अडचणी यांच्या बद्दल कोणतेही ठोस निर्णय अथवा उपाय योजना शासनाकडून राबविण्यात आल्या नाहीत.साडेसात एचपी पेक्षा जास्त क्षमता असणारे मोटर यासाठी कनेक्शन संबंधी कोणताही पर्याय महावितरण कडून देण्यात आलेला नाही.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून वाई सातारा कराड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी नदी व कॅनॉल यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात यासाठी पाटबंधारे विभागाकडून त्यांना पाण्यासाठी परवाना सुद्धा देण्यात येतो. या परवानाच्या आधारावरती त्यांना महावितरण कडून पूर्वी विद्युत कनेक्शन उपलब्ध व्हायची. त्यांना देण्यात येणारा मीटर हा त्या ठिकाणी असणाऱ्या पोलवरती बसवण्यात यायचे, ज्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नव्हती. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे आता नदीमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी जर सोलर प्रणालीचा उपयोग करायचा ठरविल्यास ते सोलर पॅनल नदीपात्रामध्ये बसवता येत नाही त्याचबरोबर नदीलगत असणाऱ्या कोणाच्याही खाजगी क्षेत्रामध्ये बसवण्याची परवानगी मिळणार नाही.

त्यामुळे नदीपात्रातून पाणी परवाना मिळवलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन शेतीपंपाचे विद्युत कनेक्शन कशा पद्धतीने देण्यात येणार याबद्दल कोणतीही पॉलिसी महावितरण कडून जाहीर करण्यात आली नाही. ज्यामुळे सातारा जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील नवीन विद्युत कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे यावर योग्य उपाय योजना राबविण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शासना विरुद्ध रस्त्यावर उतरावे लागणार यात शंका नाही असे मत व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!