निखिल शिवाजी मोरे यास भुईंज येथील खून, मोक्का प्रकरणामध्ये जामीन मंजूर

वाई :- दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत ओंकार यास जीवे ठार मारुन त्याचा मृतदेह भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते.

सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये संशयित आरोपी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव सह एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली होती. तदनंतर सदर प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( MCOCA ) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये अटक असलेला १५ नंबर चा संशयित आरोपी म्हणजेच निखिल मोरे रा. वाई याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

अर्जदार / संशयित आरोपी निखिल हा घटनास्थळी हजर असल्याबाबत आरोप त्याच्यावर होते. तसेच संशयित आरोपी निखिल हा अनिकेत बंटी जाधव याचा मुख्य साथीदार असल्याचे आरोप त्याच्यावर होते. अर्जदार निखिल मोरे व अनिकेत बंटी जाधव या दोघांना परराज्यात म्हणजेच पंजाब भतींडा येथे मार्च २०२१ मध्ये या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती.

सदर आरोपीस तपासादरम्यान झालेल्या ओळखपरेड (TIP) मध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ओळखले नसून इतर कोणतेही सुसंगत पुरावे आरोपीच्या विरोधात नाहीत , तसेच फिर्याद (FIR) मध्ये देखील अर्जदार निखिल मोरे याचे नाव नाही व आरोपी निखिल याच्यावर पुर्वी दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली असल्यामुळे मोक्का कायद्याअंतर्गत लागणारे कलम त्यास लागू होत नाही असा युक्तिवाद संशयित आरोपी / अर्जदार निखिल च्यावतीने करण्यात आला.आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने काही अटी व शर्तींवर आरोपीस जामीन मंजूर केला असून संशयित आरोपीच्या वतीने ॲड. शैलेश धनंजय चव्हाण, ॲड. प्रथमेश अनिल बनकर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

error: Content is protected !!