– महाराष्ट्र माझा – वाई प्रतिनीधी – दि. १६ एप्रिल २०२५ –
गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड, वाई कंपनीच्या वतीने त्यांच्या सीएसआर निधीतून वाई नगरपरिषद शाळा क्रमांक ५ ला जल शुद्धीकरण प्रकल्प (आरओ प्लांट) व हँड वॉश युनिट भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून ही सुविधा देण्यात आली आहे.

वाईतील पी. एम.श्री विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्र. ५ ला गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्यावतीने आरओ प्लांट आणि हँड वॉश युनिट हस्तांतरण सोहळ्यास गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे जनरल मॅनेजर युवराज थोरात, सुनील पानसे, कुमार पवार, शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, नगरसेवक प्रदीप चोरगे, नगरसेविका सौ. रुपाली वनारसे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विकास जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय रणदिवे, सेवा जेष्ठ अध्यापक विलास कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी युवराज थाेरात यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फित कापून प्लांटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी युवराज थोरात म्हणाले, शाळा क्रमांक ५ ही शंभर वर्षांचा शैक्षणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेली संस्था आहे. येथील विद्यार्थी संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून, शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वायु गरवारे साहेब व मयुरी गरवारे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्वच्छ, फिल्टर पाणी मिळावे, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.

थोरात यांनी यावेळी गरवारे कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गरवारे युथ डेव्हलपमेंट सेंटर चा उल्लेख करत सांगितले की, यामार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसचे शिक्षण देण्यात येते. तसेच त्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले जाते. तसेच त्यांना स्वत:चे व्यवसाय सुरु करण्यासही मदत केली जाते. गेल्या दोन वर्षांत ४८० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष धुरगुडे यांनी केले. प्रशालेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विकास जाधव यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

