वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील सातबाऱ्यावरील ‘पोटखराब’ क्षेत्र होणार नियमित :- राजेंद्र कचरे प्रांताधिकारी वाई

अजय संकपाळ – महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या शेतजमिनीचा काही भाग ‘पोटखराब’ (शेतीसाठी अयोग्य) म्हणून दर्शविला गेला आहे; परंतु प्रत्यक्षात त्यांनी तो लागवडीखाली आणला आहे, अशा जमिनीच्या नोंदी आता सुधारल्या जाणार आहेत.

महसूल विभागाने यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, १३ मे २०२५ पासून गावोगावी ही प्रक्रिया सुरू होणार आहे.अनेक वर्षांपासून वहिवाटीखाली असूनही ७/१२ उताऱ्यावर ‘पोटखराब’ उल्लेख असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यामध्ये पीककर्ज मिळण्यास अडथळा येणे, भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळणे, तसेच पीक नुकसान भरपाई किंवा विमा योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांच्या या समस्यांची दखल घेत महसूल विभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.या नवीन धोरणानुसार ज्या जमिनी सध्या प्रत्यक्ष शेतीसाठी वापरल्या जात आहेत, मात्र रेकॉर्डमध्ये त्या ‘पोटखराब’ म्हणून नोंदलेल्या आहेत, अशा जमिनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागवडयोग्य (नियमित) म्हणून नोंदवल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

या महत्त्वपूर्ण कामासाठी वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडल अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत येत्या १३ मे २०२५ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.महसूल विभागाने तालुक्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ७/१२ उताऱ्यावरील ‘पोटखराब’ क्षेत्राची दुरुस्ती करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाई, खंडाळा व महाबळेश्व रच्या महसूल विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन वाई प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!