फलटण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेताल कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त

फलटण प्रतिनिधी:- फलटण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या बेताल कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत नसल्याने नागरिकांमध्ये नगर परिषदेच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. एक एक दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून विविध कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा सतत ठप्प होत आहे. वॉल फुटला आहे, ट्रान्सफॉर्मर जळला आहे, साफसफाई सुरू आहे, मोटर बिघडली आहे, लाईन फुटली आहे अशी विविध प्रकारची कारणे सांगून नागरिकांना दैनंदिन पाणीपुरवठा केला जात नाही फलटण शहरातील हडको कॉलनी, गोळीबार, आनंदनगर तसेच इतर भागातही अचानकपणे पाणी सोडण्याच्या वेळी पाणीपुरवठा खंडित केला जात आहे याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता विविध कारणे देऊन नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे.

एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कोट्यावधीचा खर्च दैनंदिन पिण्याच्या पाण्यावरती करण्यात येत असून विविध योजना याकरिता राबवण्यात येत आहेत परंतु फलटण नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचा कारभारच फलटणकर नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. कधी एक दिवस कधी दोन दिवस कधी तीन दिवस सतत पाणीपुरवठा खंडित केला जात आहे व इतर दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक असणारा दैनंदिन पाणीपुरवठा नगरपरिषद कडून होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग नक्की कोणती कामे करत आहे हे समजण्यापलीकडे गेले आहे.

काही नागरिकांनी तर पाणीपुरवठा विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप करत पाणीपुरवठा विभागात कागदावरच मोटारी खरेदी व दुरुस्ती करण्यात येत असल्याचा तसेच पाणीपुरवठ्याच्या लाईन दुरुस्ती करून नागरिकांचा पैसा ठेकेदारांच्या माध्यमातून लाटण्याचा कारभार नगरपरिषदेत होत असल्याचा आरोप केला आहे. फलटण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पाण्याची मागणी वाढली आहे कोट्यावधी पैसे पाणीपुरवठा विभागात खर्च होऊनही पाणीपुरवठा विभाग हा सुधारण्याऐवजी बिघडतच चालला आहे.

पाणीपुरवठा विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्या ऐवजी टक्केवारीवर भर देत असल्याचा आरोप नागरिकांच्या होत आहे. येणाऱ्या काळात पाणीपुरवठ्याच्या सेवेवर कंटाळलेल्या फलटणच्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

एकीकडे नगर परिषद पाणी साठवण तलावात मुबलक पाणी उपलब्ध असताना फलटणच्या नागरिकांना सतत दैनंदिन पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा होत नसल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती फलटण शहरात निर्माण झाली आहे. नगरपरिषद च्या येणाऱ्या निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाची श्वेतपत्रिका काढून जाहीर करण्याची मागणी नागरिकांच्यामधून होत आहे.

24 तासापेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा खंडित ठेवल्यास कमी दाबाने पाणीपुरवठा केल्यास संबंधित पाणीपुरवठा अभियंता विरोधात दंडाची तरतूद सुरू करावी. पाणीपुरवठा विभागाच्या कडक कारवाई केल्याशिवाय फलटण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही.

प्रकाश पवार, नागरिक

error: Content is protected !!