मालदनचे विद्यालय संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत

तीन वर्षापूर्वी विद्यालयाच्या इमारतीत पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचे झाले होते नुकसान

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- वांग नदीकाठी असलेल्या मालदन ता.पाटण येथील माध्यमिक विद्यालयाच्या शाळेला संरक्षक भिंत मिळणार कधी? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

तीन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत वांग नदीला आलेल्या पुरात येथील हायस्कूल उध्वस्त झाले होते.त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात देवून हे विद्यालय सावरले.हे विद्यालय नदीकाठी असून या ठिकाणी विद्यालयाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत नसल्याने नदीपात्र विद्यालयाच्या दिशेने सरकत आहे.त्यामुळे शाळेच्या इमारतीसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मालदन येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे १९६५ मध्ये श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल सुरु झाले.मालदन सह परिसरातील वाड्यावस्त्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.विद्यालयाच्या कडेलाच वांग नदी वाहत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.पूर्वी हंगामी वाहणारी वांगनदी अलीकडच्या काळात मराठवाडी आणि महिंद धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे बारमाही वाहत आहे.

शाळेचे मैदान आणि नदीपात्र याध्ये उंच झाडांची तटबंदी आहे.मात्र गेल्या काही वर्षापासून नदीपात्र हळूहळू शाळेच्या दिशेने सरकू लागल्याने झाडे उन्मळून पडत आहेत.तीन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात हे विद्यालय उध्वस्त झाले होते.सध्या पावसाळा सुरु असून नदी तुतोंडी भरुन वाहत आहे.या ठिकाणी संरक्षक भिंत लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. अन्यथा हा धोका कायम असाच राहणार आहे.

विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या विद्यालयाच्या बाजूने संरक्षक भिंत असणे गरजेचे आहे.यासाठी लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे तरच हा प्रश्न सुटेल.

error: Content is protected !!