फलटण प्रतिनिधी:- वारुगड ट्रेकर ग्रुप फलटण यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पन्हाळा-पावनखिंड ही ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम शनिवार दि. १२ व रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मोहिमेचे आयोजक बाबासाहेब तावरे यांनी दिली आहे.

शिवकाळात १२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. इतिहासातील या देदीप्यमान घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने ‘पन्हाळा ते पावनखिंड’ पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद व बांदल-जाधव सेनेच्या शौर्याने पावनखिंड रणसंग्राम इतिहासातील सुवर्णपान म्हणून घोडखिंड पावन झाली. याच मार्गाने शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, त्याच मार्गाने पन्हाळगड ते पावनखिंड ही पद भ्रमंती मोहीम १२ आणि १३ जुलै २०२५ रोजी वारुगड ट्रेकर्स फलटण च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

या खडतर आणि सुमारे ५५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतराच्या मोहिमेसाठी ग्रुपचे सदस्य शुक्रवार दि. ११ जुलै रोजी शिवाजी चौक, फलटण येथून प्रस्थान करतील. वारुगड ट्रेकर्स ग्रुपच्या मोहीम सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या मोहिमेत म्हाळुंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी आंबेवाडी, कळकेवाडी चाफेवाडी, रिंगेवाडी पायी प्रवास करत पहिला मुक्काम माळवाडी येथे होणार आहे.

दुसऱ्या दिवशी पाटेवाडी सुकमाचा, धनगरवाडा, म्हसवडे मार्गे पांढरेपाणी पुढे पावनखिंडला पोचल्यावर मोहीम समारोप होईल असे मोहिमेचे आयोजक यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक मार्गावरून चालताना १३ जुलै १६६० ची ती निर्णायक रात्र आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे अमर शौर्य मनात साकार होते. मसाई पठार, जैवविविधतेने नटलेले जंगल, पाण्यातील पायवाटा, ओढे, धबधबे, नाले, निसरड्या पाऊलवाटा आणि निसर्गसंपन्न परिसर हे या मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत.
या मोहिमेत इंजिनिअर, पोलीस, शिक्षक, उद्योजक, व्यापारी, तरुण, व्यावसायिक, शेतकरी, कामगार अशा विविध क्षेत्रातील ८० शिवप्रेमी सदस्य सहभागी झाले आहेत. मोहिमेत अनेक अनुभवी ट्रेकर्सनेही सहभाग नोंदवला असून ग्रुपचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी सतीश नलावडे आणि त्यांचे सहकारी विशेष मेहनत घेत आहेत.

