फलटण प्रतिनिधी :- शेतात राबणाऱ्या बैलांचा वर्षातील एकमेव ‘बेंदूर’ हा सण शनिवारी फलटण तालुक्यात अनेक भागात साजरा करण्यात आला. यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली असल्याने मुबलक पाऊस झाल्याने बळीराजाने आपल्या लाडक्या सर्जा-राजांचा हा सण मात्र आनंदाने साजरा करून मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी सकाळीच बैलांना अंघोळ घातली. त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शेम्ब्या, बाशिंग, फुगे, हिंगूळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात आले. सायंकाळी विविध गावातून तसेच फलटण शहरातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक लक्षवेधी झाली. ग्रामप्रदक्षिणेनंतर सुवासीनींनी बैलांना ओवाळून पुरणपोळीचा घास भरवला. बेंदूरनिमित्त अनेक गावांमध्ये बाजारपेठा सजल्या होत्या.

बाजारात विविध मिठाई, मातीची बैलजोडी, त्यांना सजवण्यासाठीचे सामान विकण्यासाठी बाजारात ठेवण्यात आले होते. येणाऱ्या काळात भरपूर पाऊस पडो आणि बळीराज्याचे राज्य येवो अशी मागणी शेतकरी राजा परमेश्वराकडे या सणाच्या निमित्ताने करत होता.फलटण शहरात ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती. अनेक शेतकऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून सजवलेल्या बैलांना घेत वाजत गाजत मिरवणूक काढली.

बेंदूर या सणानिमित्त गावातील अनेक नागरिक सोशल मीडियावर देखील एकमेकांना शुभेच्छा देत होते तर काहींनी व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टोरी शेअर करत देखील हा सण साजरा केला. सोशल मीडियावर बेंदूर सणाचे सुंदर फोटो व्हायरल होत होते.