फलटण प्रतिनिधी:- जुन्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या महिला समुउपदेशन केंद्राचा दरवाजा तोडून कार्यालयातील १८ हजार रुपये किंमतीच्या संगणक साहित्याची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, महिला समुउपदेशन केंद्र फलटण विभाग यांचे कार्यालय बारस्कर गल्ली, जुने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर असून फिर्यादी विना अशोक घाडगे या महिला समुपदेशक असून फिर्यादी या दिनांक १६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात आल्या असता त्यांना कार्यालयाचा दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला व दरवाजा अर्धवट उघडा असलेला दिसला. यावेळी फिर्यादी फिर्यादी विना अशोक घाडगे आणि सोनवलकर महिला समुपदेशक यांनी दरवाजा ढकलुन कार्यालयात आत जावुन पाहिले असता कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

कार्यालयातील एक संगणक संच, एक सी.पी.यू, एक कलर प्रिंटर, एक हार्ड डिस्क अशा वस्तु कार्यालयात दिसल्या नाहीत. कार्यालयात दिनांक १५ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची बाब उघडकीस आली असता फिर्यादी यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ कार्यालयाला याबाबत अवगत केले. या चोरीत ७ हजार रुपये किंमतीचे एक संगणक संच, ४ हजार रूपये किंमतीचा एक सी.पी.यू,५ हजार रूपये किंमतीचा एक कलर प्रिंटर,२ हजार रूपये किंमतीची एक हार्ड डिस्क असा एकूण १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

