फलटण प्रतिनिधी :- शनिवार दिनांक १९ जुलै, २०२५ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील पहिली शिक्षक- पालक सहविचार सभा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली.

प्रथमत: प्रशालेचे प्रभारी प्राचार्य घनवट पी. डी. सर, शिक्षक- पालक सहविचार सभेचे अध्यक्ष सस्ते प्रमोद गणपत, उपाध्यक्ष राजेश्री विशाल राहीगुडे, माध्यमिक विभाग प्रमुख भागवत मॅडम, कला विभाग प्रमुख गायकवाड एस.व्ही, शास्त्र विभाग प्रमुख साळुंखे पी.व्ही, वाणिज्य विभाग प्रमुख तांबोळी ए.एस, किमान कौशल्य विभाग प्रमुख नाळे.जे.ए यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. वाणिज्य विभाग प्रमुख तांबोळी ए. एस. यांनी प्रास्ताविकामध्ये शिक्षक- पालक सहविचार सभेचा हेतू व उद्देश स्पष्ट केला व प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना दिली.

माध्यमिक विभाग प्रमुख भागवत यांनी माध्यमिक विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यामध्ये नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस, एम टी एस, हिंदी राष्ट्रभाषा, एलिमेंट्री इंटरमिजिएट परीक्षा, ए.आय गुरुजी इंटरनॅशनल लॅब याविषयीची सखोल माहिती उपस्थित पालकांना आपल्या मनोगतातून दिली. प्रा साळुंखे पी.व्ही यांनी विज्ञान विभागाची माहिती देत असताना विभागामध्ये राबवण्यात येणाऱ्या MHT-CET,NEET, JEE या वर्गांविषयीची माहिती पालकांना दिली व मिळालेल्या उज्वल यशाबद्दल पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कला विभागाचे विभागप्रमुख गायकवाड एस.व्ही यांनी आपल्या विभागाची माहिती सांगत असताना पालकांनी शिक्षकांचा संपर्क वाढवून आपल्या पाल्याच्या गुणवत्ता वाढीसाठी जागृत राहणे ही काळाची गरज आहे तसेच कला शाखा ही विद्यार्थ्यास आदर्श नागरिक बनविण्यास मदत करते असे मत त्यांनी व्यक्त केले.प्रशालेमध्ये राबवण्यात येणाऱ्या क्रीडा विभागाची सविस्तर माहिती व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व त्यात पालकांची काय भूमिका आहे व खेळामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते हे उदाहरणांच्या साह्याने सहविचार सभेत आपल्या मार्गदर्शनातून क्रीडा शिक्षक माने डी. आर यांनी मत मांडले.

शिक्षक -पालक सहविचार सभेमध्ये पालकांमधून आपले विचार व्यक्त करित असताना शितल चव्हाण यांनी आपल्या पाल्यामध्ये झालेला अमुलाग्र बदल हा फक्त या शाळेतील शिक्षकांनीच केला त्याबद्दल शिक्षकांचे कौतुक व आभार व्यक्त केले. विद्यार्थ्याला चांगला माणूस घडवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय असे मत त्यांनी मांडले तसेच शमोहन सोनवलकर ,आर्यन खरात, यश गायकवाड, नाळे या पालकांनी आपले विचार व सूचना या सभेत व्यक्त केल्या. प्रशालेने आयोजित केलेल्या सहविचार सभेबद्दल व प्रशालेतील विविध उपक्रमा बद्दल पालकांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक विकास करण्याचे केंद्र म्हणजे शाळा याविषयीची माहिती प्रा. वाघ जी.बी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. प्रशालेचे प्रभारी प्राचार्य घनवट पी.डी यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून उपस्थित पालकांना प्रशालेमध्ये राबवण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांची सखोल अशी माहिती दिली. सहविचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याबद्दल पालकांचे स्वागत व आभार मानले. मुले ही देवाघरची फुले असतात त्यांची योग्य जोपासना व निकोप मार्गदर्शन होणे गरजेचे असते.
त्या अनुषंगाने आमची शाळा सतत प्रयत्न करीत असते. शासनामार्फत येणाऱ्या सर्व योजना १०० टक्के आम्ही राबवित असतो तसेच माध्यमिक स्तरावर होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये आम्ही मुलांना समावेश करून घेतो व त्यांना माझे शिक्षक मोफत मार्गदर्शन करून त्यांना यश मिळवून दिले जाते. याचेच एक उदाहरण म्हणजे एन एम एम एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा , एमटीएस परीक्षा यामध्ये माध्यमिक विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केलेले आहे. तसेच ज्युनिअर विभागामध्ये MHT-CET मध्ये विद्यार्थ्यांना उज्वल यश प्राप्त झालेले आहे. तसेच नीट व जेईई या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवून प्रशालेच्या यशामध्ये मानाचे तुरे रोवले आहेत.
तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून प्रशालेमध्ये आर. ओ सिस्टीम बसवण्यात आली आहे.थंड पाण्याकरिता वॉटर कुलर ची सोय करण्यात आली आहे. आपल्या मार्गदर्शनपर मनोगताची सांगता करिताना सरांनी पालक वर्गाकडून मिळालेल्या सहकार्यामुळे समाधान व्यक्त केले व अशीच आपली सहकार्याची भूमिका सतत राहावी अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.टेक्निकल विषयाचे सखोल ज्ञान देणारी शाळा म्हणजे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण होय असे उदगार शिक्षक पालक सहविचार सभेच्या उपाध्यक्षा राजश्री विशाल राहीगुडे यांनी काढले.शिक्षक -पालक सहविचार सभेअध्यक्ष, पालक प्रतिनिधी सस्ते प्रमोद गणपत यांनी आपल्या मनोगतातून शाळेत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाविषयी पालकांच्या वतीने कौतुकास्पद उद्गार काढत प्रशाले विषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पालकांनी आपल्या पाल्याबरोबर संवाद वाढवणे ही काळाची गरज आहे व पाल्याच्या दैनंदिन जीवनाकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्याला यांत्रिकी मनुष्य बनवण्याचे काम अकॅडमीच्या माध्यमातून होत असते पण समाजातील एक आदर्श व सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचे धडे दिले जातात व एक आदर्श भारतीय नागरिक घडवण्याचे कार्य शाळेमधून होत असते या गोष्टीचा विचार पालकांनी केला पाहिजे असे मत आपल्या मनोगत आतून त्यांनी व्यक्त केले. शिक्षक -सहविचार सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सस्ते सी.एस, प्रास्ताविक तांबोळी ए.एस यांनी केले तर आभार चोरमले एस.वाय यांनी मानले.