फलटण प्रतिनीधी :- आळंदी पंढरपूर महामार्गावरील मौजे वडजल येथे चौकात धोकेदायक स्थितीमुळे अपघातात वाढ झाल्याने वडजल गावातील ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रणाबाबत रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन नुकतेच प्रशासनाला दिले आहे.
मौजे वडजल, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील ग्रामस्थ मंडळ वडजल यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आळंदी पंढरपूर महामार्गावरील मौजे वडजल ह्या गावात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने वडजल, काशीदवाडी, वाठार (नि) भिलकटी, फडतरवाडी इत्यादी गावांच्या वाहतुकीसाठीचा चौक आहे. मौजे वडजल चौकात रस्त्याला दिसेल असे दुभाजक नाहीत, स्पीड ब्रेकर नाहीत. रस्त्यावरील रोडलाईट नाहीत, त्यामुळे सतत अपघात होतात मौजे वडजल गावातील कै. विश्वराज बाळासो पिसाळ वय वर्ष 23 याचे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुल (दीड वर्ष) आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. कै. विश्वराज बाळासो पिसाळ हा घरातील एकमेव कर्ता तरुण मुलगा अपघाती निधनात गमावल्याने कुटुंबाची मोठी न भरून येणारी हानी झाली आहे.
प्रशासनाला वेळोवेळी याबाबत सूचना, निवेदने देऊनही मौजे वडजल गावातील अपघाताबाबत उपाययोजना केल्या नाहीत. मौजे वडजल गावासाठी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. परंतु त्याबाबत आज अखेर कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे मौजे वडजल ग्रामस्थ दिनांक 22/8/2025 रोजी सकाळी 8 वाजता रस्ता रोको करून आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्याने व्यतीत होऊन रस्ता रोको आंदोलन करीत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
सदरचे निवेदनाची प्रत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. धैर्यशील मोहिते पाटील,माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस प्रमुख सातारा,उपविभागीय अधिकारी फलटण, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण,तहसीलदार फलटण,पोलीस निरीक्षण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.

