भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले दोन ट्रॅक्टर व पोकलैंड जप्त, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून भाड्याने घेऊन कर्नाटक येथे विक्री केलेले तब्बल ६५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन जप्त करून कर्नाटकातील आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींनी अटक करून त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड मशिन हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,फलटण तालुक्यातील शेतकरी विनय संपत माने यांनी फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने देण्याची जाहिरात केली होती. त्यावर कर्नाटकातील मुस्ताक मोहम्मद हुसेन या इसमाने राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे सांगून दोन ट्रॅक्टर व एक पोकलैंड भाड्याने घेतले. मात्र,खोटी वर्क ऑर्डर दाखवून करारनुसार भाडे न देता मोबाईल बंद केला आणि ट्रॅक्टर व मशिन कर्नाटकमध्ये नेऊन विक्री केली.

तक्रारीनंतर फलटण शहर पोलिसांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबईपर्यंत शोध घेतला असता मुस्ताक मोहम्मद हुसेन याला मुंबईतून तर त्याचा साथीदार इदमा हबीब रेहमान कुंजी बिहारी याला कर्नाटकातून अटक करण्यात आली. सदरची टोळी शेतकऱ्यांना खोट्या सरकारी वर्क ऑर्डर दाखवून ट्रॅक्टर, पोकलैंड भाड्याने घेऊन फसवणूक करून ती दुसऱ्या राज्यात विकत असल्याचे उघडकीस आले.या तपासात दोन जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर व ल्यूगॉन्ग कंपनीचे पोकलैंड असा ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पो.उ.नि. विजयमाला गाजरे, सहाय्यक पो.उ.नि. संतोष कदम, अंमलदार पूनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे व जितेंद्र टिके यांनी केली.

error: Content is protected !!