ढेबेवाडी प्रतिनिधी:- गेल्या अनेक महिन्यापासून ता. पाटण येथील ढेबेवाडी,तळमावले या ठिकाणच्या सेतू कार्यालयामधील आधार कार्ड अपडेट करण्याचे काम बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ढेबेवाडी,तळमावले या ठिकाणच्या सेतू कार्यालयामधील आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे.
आधार कार्ड अपडेट करिता डोंगरदऱ्यातून 15 ते 20 किलोमीटर चा प्रवास करून कधी वाहन नाही मिळाले तर पायपीट करुन ढेबेवाडी व तळमावले या ठिकाणी सामान्य नागरिक येतात. मात्र या ठिकाणी आल्यावर आधार कार्ड सेवा बंद असल्याचे सांगितले जाते यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे.
रेशन दुकानांमध्ये केवायसी करण्यासाठी 5 वर्षाच्या पुढील मुलांचे शैक्षणिक कामासाठी शासनाच्या काही नियमानुसार लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असून या सोयी अभावी खेड्यातून येणाऱ्या नागरिकांची ससे होलपट होत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून लहान मुलांचे असो वा वृद्ध नागरिकांचे आधार अपडेट करण्यासाठी आपल्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जावे लागत आहे.
ढेबेवाडी पासून 20 ते 22 किलोमीटरवर विंग ता. कराड या ठिकाणी आधार अपडेट करण्यास गेल्यास लोकांची तुडुंब गर्दी झालेली असते त्यामुळे एका कामाला दोन ते तीन दिवस जावे लागत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला देखील आर्थिक झळ बसुन वेळ देखील वाया जात आहे. अनेक नागरिकांनी ढेबेवाडी येथील स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली मात्र याबाबत ठोस माहिती दिली जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लवकरात लवकर प्रशासनाने ढेबेवाडी,तळमावले या ठिकाणच्या सेतू कार्यालयामधील आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू करावे.
ढेबेवाडी व तळमावले या गावामध्ये आधार अपडेट करण्याची सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना आर्थिक झळ बसत आहे तसेच वेळ वाया जात आहे यामुळे मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने यावरती तात्काळ उपायोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. कविता कचरे यांनी दिला आहे.

