फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असल्याने कार्यालयातील खाजगी नेमलेले कर्मचारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांची पैशांसाठी अडवणूक करत आहेत याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कार्यालय यांच्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
फलटण येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खाजगी कर्मचारी व एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. नकाशे, अभिलेख कागदपत्र, उतारे व ईतर कागदपत्रे नक्कल देण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. मोजणीसाठी व मोजणी झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या नकाशासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असून विनाकारण मोजणी कामात त्रुटी काढून नागरिकांना नाहक त्रास देण्यात येत आहे. मोजणीसाठी लागणारी कागदपत्रांची नक्कल मागणी अर्ज केल्यानंतर ही कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिक हवालदिल होऊन मागेल तितके पैसे देऊन सुद्धा हेलपाटे मारून काकुळतीला येतात. नागरिकांना सांगितलेल्या तारखेला येऊन सुद्धा नकला मिळत नाहीत. कार्यालयातील कर्मचा-यांमध्ये कसलीही एकवाक्यता नसल्याने त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत.
काही कमर्चारी व अधिकारी कधीही वेळेत उपस्थित नसतात.मोजणी करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या पाठबळावर अनेक खाजगी मोजणी करणारे लोक नेमले असून विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे अनेक मोजणी करणारे खाजगी कर्मचारी ऑफिस मधील शासकीय टेबलवर बसून दिवसाढवळ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत काम करत आहेत त्यांना काम करण्यासाठी कोणीही आडवत नसल्याने सदर कार्यालयाचे खाजगीकरण झाले आहे की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
चाळीस ते पन्नास कि. मी. पायपीठ व प्रवास करून येणा-या नागरिकांना कामाची माहिती व्यवस्थित मिळणे अपेक्षित असते; पण येथील काही कर्मचारी व अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन पाठवितात, तर काहीजण सुरुवातीपासूनच चार-आठ दिवसानी या, असे पोकळ आश्वासन देऊन अक्षरश: हाकलून लावतात. कोणत्याही कामासाठी कमीत कमी दहा ते पंधरा हेलपाटे मारायला लावतात.
भूमी अभिलेख कार्यालयात तालुक्यातील गावांतील शेतकरी गट नकाशे, मोजणी, रस्त्याचे वादविवाद, मालमत्ता उतारे, फाळणी नकाशे यासह इतर कामासाठी येतात. मात्र, तालुका कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये बेबनाव असल्यामुळे कोणीही सहकार्यासाठी पुढे येत नाही. नक्कल मागणीचे अर्ज दोन ते तीन महिने पडून असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोजणी प्रकरणे अनेक महिने कारवाई विना प्रलंबित आहेत.
कार्यालयातील कर्मचा-यांवर आधिका-यांचा कसलाही अंकुश नसल्याने तालुक्यातील नागरिकांची ससेहोलपट होत आहे. उप अधिक्षक व शिरस्तेदार कोर्ट कामकाज, मिटींग, ट्रेनिंग अशी कारणे सांगून कार्यालयात सतत गैरहजर असतात. गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गैरहजेरीत खाजगी कर्मचारी यांच्याकडून मोजणी विषयक कामाकरीता नागरिकांना वेठीस धरले जात आहे. संबंधित कर्मचा-यांवर जिल्हा अधीक्षकांनी कारवाई करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात व अंतर्गत येणाऱ्या सर्व सिटी सर्व्हे कार्यालयात अनेक खाजगी कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने नेमण्यात आले असून हे हे खाजगी कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना पैशासाठी मारायला लावत असून या खाजगीकरण कर्मचाऱ्यांची तक्रार वरिष्ठ अधिकारी केले असता तेही खाजगी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत थोडक्यात असे आहे की पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात व त्यांच्या सिटीसर्वे कार्यालयात होत नाही याबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाकडे व भूमी अभिलेख सातारा यांच्याकडे करूनही या पाच ते सहा खाजगी कर्मचारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर खाजगी कर्मचाऱ्यांना कोणी नेमले? त्यांना पगार कोणाला करतात? नेहमी पूर्वी परवानगी घेण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहेत.

