
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण तालुक्यातील श्रीदत्त,स्वराज,श्रीराम व शरयू या चारही साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रति टन ३०१ रुपये प्रमाणे देण्याची मागणी चारही कारखाना व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यानुसार चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे.

मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसासाठी शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून ३१०० रुपये प्रति टन इतकी रक्कम देण्यात आली होती. मात्र अजूनही दुसरा हप्ता मिळालेला नाही. यावर्षी खत, मजुरी, मशागत यांचे दर वाढले असून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक अडचणीत दिवस चालले असून, दिवाळीपूर्वी प्रतिटन ३०१ रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह उर्फ धनंजय महामुलकर यांनी या वेळी सांगितले की, “सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिलेला आहे.त्यानुसार फलटण तालुक्यातील चारही कारखान्यानेही सभासद व हितचिंतक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तत्काळ दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करावी.
यामुळे येत्या गाळप हंगामासाठी शेतकरी कारखान्याला ऊस पुरवण्यास उत्सुक राहतील.”स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीदत्त,स्वराज,श्रीराम व शरयू या चारही साखर कारखान्यांना दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, आगामी १६ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या २४ व्या ऊस परिषदेत खासदार राजु शेट्टी ऊस दर जाहीर करणार असून, त्याप्रमाणे सन २०२५-२०२६ च्या गाळप हंगामाचा दर ठरविण्यात यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
निवेदन देताना फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव साखरवाडी चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, शिवसेनेचे मच्छिंद्र भोसले, दिलुकाका भोसले, प्रमोद गाडे, डॉ राजेंद्र घाडगे, किरण भोसले, आप्पा ठोंबरे, किसन शिंदे, बाळासाहेब बिचुकले, पदाधिकारी, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

