कराड ढेबेवाडी मार्गावर भला मोठा खड्डा पडल्याने अपघाताची स्थिती

ढेबेवाडी येथील मंगल साडी सेंटर व वांग नदी पुलावरील खड्डा देत आहे अपघाताला आमंत्रण

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी मार्गावर मंगल साडी सेंटर समोर व वांग नदीचा पूल ओलांडताच रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कराड ढेबेवाडी मार्गावर या प्रमुख रस्त्यावरती जीवघेण्या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होऊन वाहनांचे मोठे नुकसान होत आहे या खड्ड्यातील खडी रस्त्यावरती पसरली आहे. यामुळे हा खड्डा वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. ढेबेवाडी – कराड हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी आणी अवजड वाहने ये -जा करत असतात. अचानक समोर आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी स्वार आपले संतुलन गमावून पडत आहेत तर चार चाकी वाहने खड्ड्यात आधळून पंक्चर होणे किंवा गाडीचे मोठे नुकसान होणे अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत.

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अनेकदा वाहने एकमेकांवर आदळून लहान मोठे अपघातही होत आहेत. तर वाहने खड्ड्यांमध्ये आदळून वाहनधारकांचे मणके देखील ढिले होत आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी कराड ढेबेवाडी मार्गाचे रुंदकरण झाले असल्याने दळणवळण सुसज्ज झाले असले तरी संबंधित विभाग या खड्डयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. या रस्त्याची दुरवस्था पाहता संबंधित विभागाने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशातून केली जात आहे.

रस्त्यावरील खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत असून भविष्यात कोणतीही जीवितहानी होण्याची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी. एखाद्या वाहनधारकाचा जीव गेल्यावर संबंधित विभागाचे डोळे उघडणार का? अशा संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांच्यातून केल्या जात आहेत.

error: Content is protected !!