फलटणच्या चक्री चालकांचे जिल्हा पोलीस प्रशासनाला आव्हान दिल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण :-फलटण शहरातील सुरू असलेल्या चक्रीच्या चालक व मालकांना फलटण शहर पोलीसांची भीती राहिली नसून जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी याप्रकरणी स्वतः लक्ष घालण्याची मागणी चक्रीच्या व्यसनात बरबाद झालेल्या कुटुंबियांनी केली असून अनेक दिवसापासून सुरू असलेला चक्रीचा खुलेआम बाजार काही केल्या थांबण्यास तयार नसून फलटण मधील चक्रीची संपूर्ण माहिती जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना मिळत असताना कोणत्या कारणाने चक्री अड्ड्यांवर कारवाई करण्यात येत नाही हे अद्याप न उमगलेले कोड आहे.

मागील काही दिवसापासून फलटण शहरात चक्रीचा जवळपास आठ ठिकाणी खुलेआम धंदा सुरू असून शहरातील अनेक तरुण या चक्रीच्या नादी लागून लाखो रुपयाला बुडाले असून याबाबत माध्यमांनी अनेक दिवसापासून या प्रकरणी आवाज उठवूनही फलटण शहर पोलीस व वरिष्ठ अधिकारी चक्रीवर कारवाई करण्यास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. “कुणाचाही बाप आमची चक्री बंद करत करू शकत नाही” अशी वल्गना चक्री चालक करत असल्याची माहिती समोर येत आहे.

वल्गना करून पोलीस खात्याला खुलेआम आव्हान दिले जात आहे. फलटण शहरात गेली दोन वर्ष अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून मागील काही दिवसात फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची बदली होऊन त्या ठिकाणी कराड येथील पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर फलटण शहरातील अवैध धंद्यांना कुठेतरी उतरती कळा लागेल व संबंधित धंदे कायमचे बंद होतील असे फलटण शहरवासीयांना वाटत असताना चक्रीच्या धंद्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही.

संपूर्ण फलटण तालुक्यात तसेच सातारा जिल्ह्यात फलटण शहरातील चक्रीची चर्चा सुरू असताना आता जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी हे तरी चक्रीचा सुरू असणारा खुलेआम धंदा थांबवणार का? असा सवाल विचारला जात आहे. चक्री चालकांना कोणत्याही प्रकारची कायद्याची भीती राहिली नसून येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यात फलटण शहर चक्रीचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण करत आहे.ऑनलाईन चक्रीचे चालक व मालक, आय डी धारक यांच्यावर जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरात किती व कोण चक्री चालक आहेत, त्याचे मालक चालक कोण आहेत, चक्रीचा आयडी कोणी काढला, चक्रीचा आयडी कोणी दिला, चक्रीच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारात कुणाला किती कमिशन दिलं जातं, चक्रीतून कोणाकोणाला किती हप्ते मिळतात, चक्रीतून मिळणारा आर्थिक पैसा कोणत्या कोणत्या मार्गाने काळ्याचा पांढरा केला जातो, चक्रीच्या व्यवसायातून मिळालेला पैसा कुठे कुठे गुंतवला जातो याची सविस्तर चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

आज अखेर कोट्यावधीची माया गोळा करणाऱ्या या चक्रीचा धंदा करणाऱ्या सम्राटांना एमपीडीए कायदा म्हणजे महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, १९८१ (एम.पि.डी.ए) या कायद्यानुसार प्रतिबंध घालण्याची आवश्यकता असून या कायद्याच्या तरतुदींचा वापर करून जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आता जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामाजिक संघटना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी दाखल करणार

जिल्हा व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून चक्रीच्या अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे शहरातील काही सामाजिक संघटना पुराव्यासह रेट कार्ड सह तक्रारी दाखल करणार असून थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालून फलटण शहर चक्री मुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!