“मला निष्कारण अडकवले जातेय” निलंबित पीएसआय गोपाळ बदने याची महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:-“मला निष्कारण अडकवले जाते” अशी प्रतिक्रिया पीएसआय गोपाळ बदने याने दिली असून रात्री पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्यानंतर त्याला फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन जाताना पीएसआय गोपाळ बदने याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. डॉक्टर संपदा मुंडे यांनी एका पीएसआय सोबतच पोलिस कर्मचाऱ्यावर आरोप केले. पीएसआय गोपाळ बदने व घर मालक प्रशांत बनकर यांची थेट नावे संपदा मुंडे यांनी हातावर लिहित गंभीर खुलासे केले.

काल दुपारी प्रशांत बनकर याला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. डॉक्टर संपदा मुंडे हिने पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. संपदा यांच्या आत्महत्येनंतर पीएसआय बदने फरार होता. काल रात्री उशिरा पीएसआय बदने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. पीएसआय गोपाल बदने याची एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले.

डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याला उपजिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी रात्री उशिरा नेण्यात आले. मेडिकलसाठी नेण्यात येताना पीएसआय गोपाळ बदने याने म्हटले की, “मला निष्कारण अडकवले जातेय” त्याचबरोबर गाडीत बसल्यानंतर माध्यमांच्या कॅमेरासमोर बदने याने हातही जोडले. पीएसआय गोपाळ बदने याला आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथे दौरा असून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!