महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने दि. २५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील मैदानावर भरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान व नव्या संकल्पना यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रदर्शनामध्ये २०० हून अधिक कृषी निविष्ठा कंपन्यांचा सहभाग असणार आहे.
प्रदर्शनात नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन व संगोपन, डेअरी, पोल्ट्री, पॉलीहाऊस, ठिबक व तुषार सिंचन, बियाणे व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषी उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, हवामानाधारित शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती, शेतीचे विविधीकरण व यांत्रिकीकरण याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तरी फलटण व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण तसेच कृषी प्रदर्शन आयोजन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

