टाकळवाडे सोसायटीत बनावट खतविक्री, फलटण ग्रामीण ठाण्यात दोघांवर गुन्हा; कृषी विभागाकडून कारवाई

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण (प्रतिनिधी) : टाकळवाडे (ता. फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना बनावट खतांची विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळवाडे तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ही संस्था परवाना धारक असतानाही शेतकऱ्यांना खते, बियाणे व कृषी औषधांची विक्री करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी या संस्थेमध्ये बनावट खतांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांना मिळाली.त्या अनुषंगाने कृषी विभागाने तातडीने हालचाल करत संस्थेच्या गोदामातील खतांच्या साठ्यातून नमुने गोळा केले.

हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी अहवालात सदर संस्थेमार्फत बनावट व निकृष्ट दर्जाची खते विक्री करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.या याप्रकरणी प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालाच्या आधारे फलटण तालुका कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) सोनाली सुतार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष बाळासाहेब डवरे (रा. टाकळवाडे, ता. फलटण) व विनायक उत्तम पवार (रा. ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!