वडूज येथे बनावट खते व कीटकनाशकांचा कारखाना उघड; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

वडूज | प्रतिनिधी

:सातारा जिल्ह्यातील वडूज (ता. खटाव) येथे सातारा जिल्हा कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा कारखाना उघडकीस आला. शनिवारी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे ३० लाख रुपयांहून अधिक किमतीचा बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रतिक काळे (रा. वडूज, ता. खटाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार (फरांदे) यांनी दिली.प्रतिक काळे हा गेल्या काही काळापासून बनावट रासायनिक खते व कीटकनाशके तयार करून ती राज्यभरातील कृषी विक्रेत्यांना विक्रीसाठी पुरवत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

त्यानुसार यापूर्वी सोलापूर, सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यांतील विविध कृषी सेवा केंद्रांवर छापे टाकून बनावट खते व कीटकनाशके जप्त करण्यात आली होती तसेच संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.मात्र मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. हा कारखानदार दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभराने आपले गोदाम बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता.

अखेर शिराळा (जि. सांगली) येथील एका कृषी विक्रेत्याकडे छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी याने तयार केलेली बनावट खते व कीटकनाशके आढळून आली. त्या तपासातून प्रतिक काळे याच्या गोदामापर्यंत पोहोचण्यात यश आले.त्यानंतर सातारा जिल्हा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वडूज येथील गोदामावर छापा टाकून बनावट रासायनिक खते, कीटकनाशके, अनुदानित खतांचा कच्चा माल, बनावट छापील पिशव्या व इतर साहित्य जप्त केले.

ही बनावट उत्पादने नामांकित कंपन्यांच्या बनावट पिशव्यांमध्ये भरून ती अनुदानित व विनाअनुदानित खतांच्या नावाखाली गावोगाव विक्री केली जात होती. हा कच्चा माल नेमका कुठून आणला जात होता, याचा तपास पोलीस व कृषी विभाग करीत आहेत.

सातारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जिल्हास्तरीय भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे, खटावचे गुणवत्ता नियंत्रण कृषी अधिकारी के. के. राऊत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फरणे सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी कुठेही बनावट रासायनिक खते किंवा कीटकनाशके आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार – फरांदे यांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

error: Content is protected !!