महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण येथे आयोजित यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा–२०२६ उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने फलटणमध्ये प्रथमच या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष सी. एल. पवार, ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), सदस्य हणमंतराव निकम व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या प्राचार्या एन. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणतर्फे प्रकाशित सन २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून उपस्थित सर्वांना ही दिनदर्शिका मोफत वितरित करण्यात आली.
या शैक्षणिक मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्था, करिअर मार्गदर्शन केंद्रे, अकॅडमी व फूड स्टॉल्सच्या प्रतिनिधींचा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सन्मानचिन्ह, दिनदर्शिका व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय मनोगतातून डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–२०२० नंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक पर्यायांमुळे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा, करिअरची स्पष्टता व आत्मविश्वास मिळावा, या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. “यशवंत” हे नाव जसे सुचवते, तसेच हा मेळावा विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच विद्यार्थ्यांनी व पालकांनी या मेळाव्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.या मेळाव्यात इंजिनिअरिंग कॉलेजेस, करिअर अकॅडमी, स्पोकन इंग्लिश संस्था, मानसोपचार तज्ञ यांच्यासह फलटण शहरातील नामांकित स्वादिष्ट फूड स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थी व पालकांनी विविध अभ्यासक्रम, करिअर संधी, प्रवेश प्रक्रिया याबाबत सखोल माहिती घेतली.मेळाव्यात शास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. समीक्षा भिवरकर यांनी आपल्या मनोगतातून या करिअर मेळाव्याबाबत समाधानकारक भावना व्यक्त केल्या.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापकवृंद, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यादव एस. डी. व सुजाता पवार यांनी केले, तर प्रा. राऊत एस. एन. यांनी आभार प्रदर्शन केले.

