निरा नदी प्रदूषणावर आमदार सचिन पाटील यांचा संतप्त इशारा

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी

निरा नदीला मृत्यूकुंडात रूपांतर करणाऱ्या दूषित सांडपाण्याच्या प्रकारावर आमदार सचिन पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. सांगवी (ता. फलटण) येथे नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणात आता केवळ पाहणी नव्हे तर थेट आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा दोषी अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल.

नदीपात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग, वास आणि प्रवाह पूर्णतः बदललेला असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नदीकाठची शेती उद्ध्वस्त होत असून नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. “ही परिस्थिती केवळ पर्यावरणाची नाही, तर लोकांच्या जीवाशी थेट खेळण्याची आहे,” असे ठणकावून सांगत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

निरा नदीला मिळणाऱ्या प्रत्येक ओढा, नाला आणि सांडपाणी वाहिनीची सखोल तपासणी करण्याचे आदेश आमदारांनी दिले.“कोणत्या ठिकाणाहून घाण पाणी नदीत सोडले जाते, हे शोधण्याची जबाबदारी तुमची आहे. दोषी प्रकल्प, कारखाने किंवा व्यक्तींची नावे स्पष्ट करा आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. केवळ कागदी अहवाल नको, जमिनीवर दिसणारी कारवाई हवी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

आमदार पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (फिल्टरेशन प्लांट) न चालवता नदीत पाणी सोडणाऱ्या कोणत्याही उद्योगाला माफी दिली जाणार नाही. नियम तोडणाऱ्या प्रकल्पांचे परवाने रद्द करण्यासह दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.“प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता गप्प बसण्याचा नाही, तर अधिकार वापरण्याचा काळ आहे,” असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

या प्रकरणात दिरंगाई, दुर्लक्ष किंवा ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत आमदार पाटील यांनी कडक इशारा दिला. ठरावीक कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.यावेळी सांगवी व परिसरातील ग्रामस्थांनी नदीकाठच्या भागात पसरलेल्या दुर्गंधीमुळे दैनंदिन जीवन असह्य झाल्याचे सांगितले.

पाणी वापरण्यायोग्य राहिले नसून आजार बळावत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या पाहणीवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!