फलटण नगरपरिषदेची थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम; थकबाकीदारांचे गाळे सील करण्यास सुरुवात

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी

फलटण नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मोठ्या प्रमाणात थकीत कर असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या स्पष्ट सूचनेनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली असून, थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

या वसुली मोहिमेसाठी कर अधिकारी राजेश काळे आणि कर निरीक्षक रोहित जमदाडे यांच्या नियंत्रणाखाली तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांकडून शहरातील मोठ्या थकबाकीदार मालमत्ता धारकांची तपासणी करून प्रत्यक्ष कारवाई केली जात असून, थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ता सील करणे, जंगम मालमत्ता जप्त करणे, तसेच नळ कनेक्शन बंद करणे यासारख्या कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये खाजगी मालमत्ता धारकांसह नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांचाही समावेश आहे.

सदर कारवाईमुळे शहरातील अनेक थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, काही ठिकाणी प्रत्यक्ष गाळे सील करण्यात आल्याने कर वसुलीला गती मिळाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेच्या महसूल वाढीसाठी व नागरी सुविधा सुरळीतपणे चालविण्यासाठी कर वसुली अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, फलटण नगरपरिषदेने शहरातील सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह आपल्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे. अन्यथा वसुलीची मोहीम येत्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद सर्व थकबाकीदारांनी घ्यावी, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!