महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
सातारा प्रतिनिधी
महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक द्यावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्यासह इतर राजकीय चर्चेचे सर्व पर्याय खुले ठेवले जातील, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.सातारा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर आमदार महेश शिंदे, संजिवराजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.देसाई म्हणाले, महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जागा वाटप करताना शिवसेनेला प्राधान्य दिले जावे, ही आमची ठाम भूमिका आहे.
तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेचा सन्मान राखून वाटाघाटी केल्या तरच महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार होईल. मानसन्मान राखला गेला तर ठीक, अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.जागा वाटपाबाबत बोलताना देसाई यांनी सांगितले की, आमच्यासोबत समविचाराने चर्चा करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत राजकीय समीकरणांचा विचार केला जाऊ शकतो. जागा वाटपासाठी आमचे सर्व चर्चेचे पर्याय खुले असून, शिवसेनेच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून निर्णय घेतले जाणार नसतील, असा इशाराही त्यांनी दिला.
पालिका निवडणुकांचा संदर्भ देत देसाई म्हणाले, ज्या पद्धतीने कराड पालिका निवडणूक शिवसेनेने लढवली, त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही लढवल्या जातील. यावेळी कोणाचाही विचार न करता शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. मात्र फलटण पालिकेत काही राजकीय अंदाज चुकल्याने अपयश आले, हेही त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीबाबत बोलताना देसाई यांनी स्पष्ट केले की, सध्या या दोन्ही पक्षांकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव शिवसेनेसमोर आलेला नाही.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष निरीक्षक नेमून त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात येणार असून, त्या आधारे पुढील रणनीती ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.शिवसेना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगत, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांच्या बैठका घेण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी दिली. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय इच्छुक उमेदवारांची माहिती संकलित करण्यात आली असून, निवडणुकीच्या तयारीला वेग आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेना (शिंदे गट) आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून स्पष्टपणे मिळाले आहेत

