महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण : जिद्द, सातत्य आणि देशसेवेची तीव्र ओढ असेल, तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे मंथन संदीप नरुटे या मुळगाव मोरेवाडी तालुका फलटण सध्या रायगड पोलीस दलात हवालदार म्हणून सेवा देणाऱ्या वडिलांचा मुलगा असलेल्या मंथनने यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीए परीक्षेत यश संपादन करत भारतीय नौसेनेत अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.
एप्रिल २०२५ मध्ये पार पडलेल्या यूपीएससी एनडीए परीक्षेचा अंतिम निकाल ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर झाला होता. या निकालात मंथन नरुटे याने देशपातळीवर ४९० वा क्रमांक पटकावला. त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी त्याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
या यशामुळे रायगड जिल्ह्यात तसेच पोलीस दलात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.मंथनचे मूळ गाव मिरेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) असून वडील संदीप नरुटे हे रायगड जिल्हा पोलीस दलात कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. वडील संदीप नरुटे यांचे संपूर्ण शिक्षण फलटण येथे झाले. वडिलांच्या नोकरीमुळे मंथनचे बालपण खोपोली, जि. रायगड येथे गेले.
गणवेशातील वडील पाहतच त्याच्या मनात देशसेवेचे स्वप्न रुजत गेले.त्याचे शालेय शिक्षण दहावीपर्यंत खोपोली येथील कर्नियल कॉन्व्हेंट स्कूल येथे झाले. दहावीनंतर इतरांप्रमाणे इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्याऐवजी त्याने थेट एनडीए परीक्षेचे ध्येय निश्चित केले. या प्रवासात त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्या तीन वेळा तो लेखी परीक्षा व एसएसबी मुलाखतीपर्यंत पोहोचला; मात्र अंतिम यश मिळाले नाही.अपयशाने खचून न जाता, मंथनने बी.टेक इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच एनडीएचा अभ्यास सुरूच ठेवला.
शिस्तबद्ध दिनचर्या, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अखेर चौथ्या प्रयत्नात त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. भारतीय नौसेनेत अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी त्याला मिळाली.या यशामागे मंथनची आई राणी नरुटे यांचे मोलाचे योगदान असून, कुटुंबाने दिलेल्या मानसिक आधारामुळेच तो संघर्ष टिकवू शकला, अशी भावना मंथन व्यक्त करतो.
त्याच्या निवडीनंतर रायगड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, नातेवाईक व फलटण तालुक्यातील नातेवाईक,मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आजच्या काळात झटपट यशाच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी मंथन नरुटेची कहाणी प्रेरणादायी ठरत आहे. एका सामान्य पोलिस हवालदाराचा मुलगा कठोर परिश्रमाच्या जोरावर यूपीएससीमार्फत लष्करी अधिकारी बनतो, ही बाब देशसेवेसाठी सज्ज असलेल्या तरुणांना नवी दिशा देणारी आहे.

