मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील दरे गावी आले आहेत.
विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी होत असून शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडला असला तरी गृह आणि अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर डोळा आहे. ही खाती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ दरे गावी आले आहेत. त्यावरच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांना कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील असे मला वाटत नाही’, असे शिरसाट यांनी यापूर्वी म्हटले होते.
त्याचवेळी महायुतीची बैठक 1 डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होऊ शकतो.
एकंदरीतच मुख्यमंत्री पदाच्या निर्णयावरून महायुती मध्ये आजूनही घमासान सुरू असून अजूनही यावर समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच आज कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.