ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी ता.पाटण येथे गेल्या चार महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
ढेबेवाडी येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पशुधनावर अवलंबून आहे. दूध व्यवसाय, शेतीची कामे आणि इतर अनेक गोष्टींसाठी जनावरे शेतकऱ्यांचा अविभाज्य भाग आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ढेबेवाडी येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही.
या परिसरातील शेतकरी गाई,म्हैशी, शेळ्या यांचा सांभाळ करून यांच्यापासून मिळणारे दूध विक्री करून यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र याच गाई म्हैशी जेव्हा आजाराशी झुंज खेळत असतात तेव्हा त्यांचा उपचार करायचा तरी कुठे ? हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गेल्या चार महिन्यापासून ढेबेवाडी मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने या अभावी खाजगी डॉक्टरांकडून दुप्पट पैसे देउन आपल्या जनावरांवरती उपचार करावा लागत आहे तसेच शेतकऱ्यांच्या खिशाला देखील आर्थिक झळ बसुन अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसापासून ढेबेवाडी सह परिसरामध्ये बिबट्या लोकवस्तीमध्ये येऊन गाई,म्हैशी, शेळी यांच्या वरती हल्ला करत आहे तर काहीना ठार देखील केले आहे तर काही जनावरे उपचारा अभावी आजाराच्या विळख्यात सापडून त्यांचा मृत्यू देखील होत आहे.जंगली जनावरांच्या हल्ल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने घटनेचा पंचनामा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभ मिळत नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे.
संबंधित विभागाने यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून पशुधनाचे रक्षण होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुरक्षित राहील.
जनावरांच्या आजारामुळे दुग्ध उत्पादन घटते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. या सगळ्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. एखाद्या जनावराचा उपचारा अभावी मृत्यू झाल्यास, कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान होते.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक तात्काळ करणे गरजेचे आहे..येथील शेतकऱ्यांसाठी जनावरे ही कुटुंबातील सदस्यांसारखी आहेत, आणि त्यांना आजारी पाहून त्यांना खूप दुःख होते." निवास पवार (शेतकरी ढेबेवाडी )

