फलटण:- विविध शासकीय योजना व विविध शासकीय कामंकरिता शेतकऱ्यांनी आपला सातबारा आणि आधार कार्ड जोडून फार्मर आयडी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ऍग्रीस्टॅक (agristack) योजनेची आपल्या राज्यामध्ये सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे याची अंमलबजावणी फलटण तालुक्यात देखील सुरू असून या योजनेमध्ये आपला सातबारा आणि आधार कार्ड जोडून फार्मर आयडी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. फार्मर आयडी प्राप्त करून घेतल्यामुळे आपल्याला पी एम किसान तसेच नैसर्गिक आपत्तीचे अनुदान थेट खात्यामध्ये प्राप्त करणे सुलभ होणार आहे.

त्याशिवाय विविध शासकीय विभाग यांचेमार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजना जसे की घरकुल, सौर कृषी पंप इत्यादींचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. तसेच भविष्यामध्ये आपल्या शेतातील पिकांच्या देखभालीबाबत तज्ञ व्यक्तींचे माहितीपर संदेश देखील आपल्या मोबाईलवर थेट प्राप्त होणार आहेत. त्याशिवाय आपला सातबारा यास आधार कार्ड याची जोडणी केल्यामुळे आपली शेतजमीन अन्य कोणी व्यक्ती फसवणुकीने विक्री करू शकणार नाही.
फार्मर आयडी प्राप्त करून घेण्यासाठी आपले आधार कार्ड आणि आधार जोडणी केलेला मोबाईल घेऊन आपल्या जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा असे आवाहन फलटण तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. फलटण तालुक्यात पी एम किसान योजनेचे जवळपास 61 हजार लाभार्थी असून आजवर आपल्या तालुक्यात जवळपास 9000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऍग्रीस्टॅक योजनेत 100 टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असल्याने लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी सदर नोंदणी करून घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
या कामी कोणतीही अडचण असल्यास आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक अथवा विकास सेवा सोसायटी सचिव यांना संपर्क करावा असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.