महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :-काढणे येथील डोंगर पठारावरील शिद्रुकवाडी ता. पाटण येथील चंद्रकांत बापू घराळ या शेतकरी गोप्रेमी कुटुंबांने आपल्या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे करून गोमातेवरील आपले प्रेम व आदर व्यक्त केला आहे.
अलीकडच्या काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील काही कुटुंबांनी त्यांच्या घरी पाळलेल्या गर्भवती गायीसाठी पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा सुरू केली आहे. मानवांमध्ये जसे गरोदर स्त्रीचे डोहाळे जेवण साजरे केले जाते, त्याचप्रमाणे गोमातेचेही डोहाळे जेवण करून एक अनोखी परंपरा जपली जात आहे.
या कार्यक्रमांसाठी खास गायीला (गोमातेला ) नटवले. तिला सुंदर झूल, फुलांच्या माळा, गळ्यात घुंगुरमाळा आणि पायात तोडे घालून सजवले व परिसरातील महिला या सोहळ्यासाठी एकत्र एकत्र येऊन त्या गायीचे औक्षण केले. पारंपरिक डोहाळे जेवणाची गाणी गातात आणि खण-नारळाने तिची ओटी भरली. अनेक ठिकाणी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला तसेच गायीला विशेष चारा आणि फळे खाऊ घातली.
या कुटुंबांसाठी गाय हे केवळ एक जनावर नसून, ती त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. गायीचे संगोपन ते पोटच्या मुलीप्रमाणे करतात. त्यामुळे घरातील सदस्याप्रमाणेच तिच्या गरोदरपणात तिचे लाड पुरवण्यासाठी आणि नवीन वासराच्या (पाहुण्याच्या) आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला.
अशा प्रकारचे आगळे-वेगळे डोहाळे जेवण सोहळे समाजात एक सकारात्मक संदेश देतात, ज्यामुळे देशी गायींचे संवर्धन आणि पशुधनावरील प्रेम अधिक वाढण्यास मदत होते. घराळ कुटुंबाने आपल्या लाडक्या गोमातेसाठी आयोजित केलेले हे सोहळे परिसरात आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत.

