महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ‘महाराजस्व’ व ‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील जिंती येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच तालुक्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांच्या प्रशासनाशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन समस्या, तक्रारी व मागण्या तात्काळ मार्गी लावणे हा होता. महसूल विभाग, कृषी, आरोग्य, शिक्षण, पंचायत समिती, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, वीज वितरण, जलसंधारण आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या योजना कागदावर न राहता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. महसूल व इतर विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित प्रश्नांना त्वरित न्याय देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेत स्थानिक प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शासन आपल्या दारी उपक्रम अधिक परिणामकारक राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात जमिनीच्या नोंदी, फेरफार, वारस नोंद, शासकीय योजनांशी संबंधित अर्ज, विविध शासकीय विभागाच्या निगडित तक्रारी व समस्या याचे निराकरण तत्काळ करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.या उपक्रमामुळे जिंती व लगत गावातील नागरिकांना शासनाची दारे प्रत्यक्ष गावात उघडल्याचा अनुभव मिळाला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील संवाद अधिक दृढ झाला आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम सतत व व्यापक प्रमाणात राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

