शहीद नायक विकास गावडे यांना अखेरचा सलाम; फलटण तालुका शोकमग्न

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुदानमधील शांतता मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले बरड (ता. फलटण) येथील सुपुत्र शहीद नायक विकास विठ्ठल गावडे यांचे पार्थिव सोमवारी दुपारी फलटणमध्ये दाखल झाले आणि संपूर्ण तालुक्यात शोकसागर उसळला. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर जवानाला अश्रूंनी आणि अभिमानाने अखेरचा निरोप देण्यात आला.

सुदान येथून विमानाने पुणे येथे पार्थिव आणल्यानंतर, लष्कराच्या विशेष वाहनातून ते फलटणमध्ये आणण्यात आले. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात शहीद जवानाच्या दर्शनासाठी तरुणांसह नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. “विकास गावडे अमर रहे”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला. तेथून तिरंगा ध्वज लावलेल्या दुचाकींच्या रॅलीसह पार्थिव बरड गावाकडे मार्गस्थ झाले.

मार्गावर अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांचा वर्षाव केला. घराघरांसमोर सडा-रांगोळी काढून, मेणबत्त्या पेटवून वीर जवानाला मानवंदना देण्यात आली. बरड गावात प्रवेश करताच वातावरण अधिकच भावुक झाले. सायंकाळी पार्थिव निवासस्थानी नेण्यात आल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीने आणि पत्नीने पार्थिवाचे दर्शन घेताच परिसरात एकच शांतता पसरली.

उपस्थित प्रत्येक जण स्तब्ध झाला. सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज, भारतीय तिरंगा आणि जवानाचा गणवेश कुटुंबाकडे सुपूर्द केला. हा क्षण अत्यंत हृदयद्रावक ठरला.यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

“देशासाठी दिलेले बलिदान कधीही विसरले जाणार नाही. शासन आणि समाज गावडे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.अंत्यसंस्कारापूर्वी भारतीय सैन्य दल व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ठीक ७ वाजता वडील विठ्ठल गावडे यांनी जड अंतःकरणाने पार्थिवाला भडाग्नी दिला.

त्या क्षणी संपूर्ण बरड गाव अश्रूंनी न्हाऊन निघाले.शहीद विकास गावडे यांनी २०१६ साली भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता. लेह–लडाख, जम्मू-काश्मीर यांसारख्या अत्यंत कठीण आणि संवेदनशील भागांत त्यांनी तब्बल आठ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुदानमधील शांती मोहिमेत देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या शौर्यपूर्ण बलिदानामुळे बरड गावासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि दुःख यांची दाट छाया आहे.

error: Content is protected !!