फलटण भूमी अभिलेख कार्यालय खाजगी कर्मचाऱ्याच्या ताब्यात, नागरिकांची होतेय आर्थिक लुट

फलटण :- येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून अनेक खाजगी लोकांना कर्मचारी म्हणून नेमले गेल्याने तालुक्यातील नागरिकांची आर्थिक लूट सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकंदरीतच सुरू असलेल्या मनमानी कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण भूमी अभिलेख हे कार्यालयात नागरिकांना विविध प्रकारची नक्कल देण्यासाठी खाजगी लोकांची व शिपायांची नेमणूक करण्यात आली असून खाजगी लोक जे जास्त पैसे देतील त्यांच्या नक्कल करून देत आहेत तर अनेक शिपाई त्यांची कामे सोडून वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची कामे विनाअधिकार करत आहेत. नक्कल बनवून देणे, आवक जावक काम पहाणे, ऑनलाइन नोंदणी काम पहाणे, यासारखी कामे शिपाई दर्जाच्या कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहेत.तसेच या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोजणी व इतर कामकाजाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही अथवा कार्यालयाशी संबधित घेऊन आलेले काम केले जात नसल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या कार्यालयात खाजगी लोक दिवसभर कार्यालयात कोणत्याही टेबलवर बसत आहेत व अभिलेख विभागात प्रवेश करत आहेत. जे अभिलेख फक्त शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना हाताळण्याचा अधिकार आहे ते अभिलेख खाजगी लोक व शिपाई हाताळत नक्कल बनवून देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

खाजगी लोकांना अनधिकृतपणे कामावर ठेवून त्यांच्याकडून हप्ते घेऊन नागरिकांना वेठीस धरले जात असून नियमबाह्य व अनधिकृत नकला देणे व मोजणीची कामे खाजगी लोकांकडून केली जात असून नागरिकांनी याबाबत तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

याठिकाणी सबंधित खाजगी लोक कार्यालयात आलेल्या नागरिकांना कामानिमित्त कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून दिले जात नाही यामुळे अगोदरच वादग्रस्त कामकाजात प्रसिद्ध असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या या प्रकारच्या कामकाजामुळे फलटण तालुक्यात प्रचंड नाराजी सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा भूमी अधीक्षक यांना अनेक तक्रारी होऊनही याप्रकरणी दखल घेतली गेली नाही. खाजगी लोक व शिपाई यांना काम करण्यास मूक संमती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!