फलटण प्रतिनिधी: अंगणवाडी सेविकांवर बी.एल.ओ. (बूथ लेव्हल ऑफिसर) कामाची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या संदर्भात तहसील कार्यालयास नोटीस देत १० मार्च २०२६ पासून तहसील कार्यालय फलटण येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेतर्फे प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांवर आधीच विविध शासकीय योजनांची जबाबदारी आहे. मात्र त्या कामाचा विचार न करता त्यांच्यावर बी.एल.ओ.चे अतिरिक्त काम लादले जात आहे. याबाबत संघटनेतर्फे अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले होते की, अंगणवाडी सेविकांनी प्रांत अधिकाऱ्यांना भेटून बी.एल.ओ. कामाची सक्ती करू नये, अशी हात जोडून विनंती केली होती. तसेच या संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध झालेल्या जी.आर.चीही माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. तरीही उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर जबरदस्तीने हे काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, आय.सी.डी.एस. (एकात्मिक बालविकास सेवा योजना) अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ठराविक जबाबदारी असताना त्यांच्यावर योजना बाह्य कामे लादली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ कामकाजावर परिणाम होत असून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.निवेदनात असेही म्हटले आहे की, बी.एल.ओ. काम स्वीकारले नाही तर पोलिस कारवाई करून एफआयआर किंवा गुन्हे दाखल करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडून दिला जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दडपण आणले जात असून त्यांच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी यांनी आज १० मार्चपासून तहसील कार्यालय फलटण येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणादरम्यान कोणत्याही अंगणवाडी कर्मचाऱ्याला इजा झाली किंवा त्यांची प्रकृती बिघडली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला होता.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा परिषद सातारा येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या या भूमिकेमुळे फलटण तालुक्यातील प्रशासन आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्यातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
रात्री उशिरा ९ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर व निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उद्या दिनांक ११ रोजी सकाळी ११ वाजता मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बाठकीचे आयोजन केले आहे. आवश्यक मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या महिला सदस्यांनी सदर उपोषण तात्पुरते मागे घेतले.

