बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांना ३१ जानेवारीपर्यंत अंतिम संधी मुदतीनंतर कनेक्शन तोडणार, दंडात्मक कारवाई निश्चित : मुख्याधिकारी निखिल जाधव

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी – फलटण नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली असून, अशा नागरिकांनी आपले नळ कनेक्शन ३१ जानेवारीपर्यंत स्वतःहून नियमित करून घ्यावे, अन्यथा संबंधित कनेक्शन कायमचे बंद करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.

फलटण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पाणीपुरवठ्यावर येणारा ताण, पाण्याची गळती तसेच योग्य दाबाने पाणी न मिळण्याच्या तक्रारी लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी दिलेल्या मुदतीत स्वतःहून नगरपालिकेकडे नळ कनेक्शनची नोंदणी केल्यास कोणताही दंड न आकारता नळ कनेक्शन नियमित करून दिले जाणार असल्याचेही मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.

मात्र, ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही नोंदणी न करणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून त्यांच्यावर आर्थिक दंडासह इतर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.दरम्यान, शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन कायमचे बंद करण्याचा निर्णयही नगरपरिषदेने घेतला आहे. सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी पर्याय म्हणून दोन ते पाच नागरिकांच्या गटाला एकत्रित ‘ग्रुप नळ कनेक्शन’ देण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

फलटण शहरातील प्रत्येक नागरिकाला वेळेत, पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा मिळावा, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा व्यवस्थेत शिस्त आणून शहरातील सर्व भागांना सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!