फलटण प्रतिनिधी: – फलटण येथील एका वृद्ध नागरिकाचे अज्ञात चोरट्याकडून पाकीट लंपास करून पाकिटातील १५ हजार व एटीएम कार्ड वरून १३ हजार ९०० अशी २८ हजार ९०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी शिवाजी चंदरराव निकम ( रा लक्ष्मीनगर फलटण ता.फलटण जि सातारा) हे त्यांची मुळीकवाडी ता फलटण येथे शेतजमिन असल्याने दिनांक २ जुलै रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास मुळीकवाडी, ता. फलटण येथे जाण्यास निघाले त्यानंतर बसने दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास मुळीकवाडी ता फलटण येथे आले असता त्यांच्या शेतातील शेडवर असताना दुपारी १:४९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवाजी निकम यांना त्यांच्या सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण खात्यातील ए.टी.एम कार्डवरून बारामती येथील ए.टी.एम मशिनमधून ९ हजार ९०० रुपये व ४ हजार रुपये पैसे काढले असल्याचे दोन मेसेज आले.

फिर्यादी शिवाजी निकम यांनी त्यांचे ए.टी.एम कार्ड पाकीटात आहे का असे पाहिले असता त्यांना खिशात पाकीट आढळून आले नाही. त्यांच्या खिशातील पाकीटात १५ हजार रुपये रोख रक्कम सेंन्ट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा फलटणचे २ ए.टी.एम कार्ड असे असलेले पाकीट आढळून आले नाही.

सदरच्या चोरीच्या प्रकरणात फिर्यादी शिवाजी निकम यांची २८ हजार ९०० रुपयांची चोरी करण्यात आली असून फिर्यादी वृद्ध असल्याने लोणंद पोलीस ठाणे येथे जाता येत नसल्याने फिर्यादी यांनी दिनांक १० जुलै रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.