फलटण – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेत शेती व पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ केले आहे.
हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून अंमलात येणार असून यासंदर्भातील अधिकृत शासन राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.आतापर्यंत पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना करारपत्र, हमीपत्र व इतर कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. या शुल्कामुळे अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता.
शासनाच्या या निर्णयामुळे हा भार कमी होऊन शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे.या निर्णयाचा लाभ सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच इतर वित्तीय संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या शेती व पीक कर्जांनाही मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात कर्ज उपलब्ध होऊन वेळेवर बियाणे, खते, औषधे व शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे सोपे होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासही या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

