महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
मुंबई | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण पूर्ण करणे अत्यावश्यक असून, प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कायद्यानुसार पार पडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी, सावली, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच लहान बाळांसह येणाऱ्या महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात यावे. तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश आहेत.दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार २३ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता संपणार असून, त्यानंतर कोणत्याही माध्यमातून निवडणूक प्रचार करता येणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

