‘पदवीधर’च्या अंतिम मतदार यादीला प्रसिद्धी, मतदार नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार; नवीन नावनोंदणी व दुरुस्तीची संधी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

पुणे प्रतिनिधी

पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीला सोमवारी प्रसिद्धी देण्यात आली आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याने पात्र पदवीधर व शिक्षकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

पुणे विभागात एकूण पुणे विभागात ३ लाख १० हजार ९६४ पदवीधर आणि ५१ हजार ९७९ शिक्षक मतदार असल्याची नोंद अंतिम यादीत आहे. अंतिम मतदार यादी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालय तसेच संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय पदवीधर मतदार नोंदणी२०२५ च्या मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ६१ हजार ११३, सोलापूरमध्ये ३८ हजार २२, साताऱ्यात ४२ हजार ६३, सांगलीत ७८ हजार ३६६ आणि कोल्हापूरमध्ये ९१ हजार ४०० मतदारांची नोंदणी झाली आहे. ही एकूण नोंदणी ३ लाख १० हजार ९६४ इतकी आहे.

शिक्षक मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात १२ हजार १८७, सोलापूरमध्ये १३ हजार १५८, साताऱ्यात ९ हजार ९७, सांगलीत ७ हजार ३२२ आणि कोल्हापूरमध्ये १० हजार २१५ मतदारांची नोंदणी झाली आहे. ही एकूण नोंदणी ५१ हजार ९७९ इतकी आहे.

मागील निवडणुकीच्या तुलनेत घट

२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अंतिम मतदार यादीत नोंद झालेल्या मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरूच, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नवीन नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदलयासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पदवीधर मतदारांसाठी नमुना क्रमांक १८, तर शिक्षक मतदारांसाठी नमुना क्रमांक १९ द्वारे अर्ज करता येणार आहे. याशिवाय आधी नोंद असलेल्या मतदारांना दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.

नागरिकांना आवाहन

मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी तपासून पात्र असूनही नाव नोंद न झालेल्या पदवीधर व शिक्षकांनी तातडीने अर्ज करावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!