नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघातच कोट्यवधींचा प्रतिबंधित तंबाखू कारखाना उघडकीस, राज्यात खळबळ

FDA मंत्र्यांच्या मतदारसंघातच प्रतिबंधित तंबाखू उद्योग; ९ कोटींपेक्षा अधिकचा माल जप्त

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी मतदारसंघातच कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ तयार करणारा कारखाना आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील तळेगाव (ता. दिंडोरी) येथे असलेल्या एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने छापा टाकून ही धक्कादायक बाब उघडकीस आणली.

या कारखान्यात राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा, जर्दा, सिगारेट्स व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे बिनधास्तपणे उत्पादन सुरू होते. छापेमारीदरम्यान तयार माल, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, यंत्रसामग्री असा सुमारे ९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात हा कारखाना ‘इलाइट क्राउन इंटरनॅशनल लिमिटेड’ या नावाखाली चालवला जात असल्याचे समोर आले असून, येथे तयार होणारा प्रतिबंधित माल राज्याच्या विविध भागांमध्ये तसेच परराज्यात पाठवला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कारखान्याला परवाना नसताना आणि कायद्याचे सर्रास उल्लंघन करून उत्पादन सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कारखान्याचा संचालक व इतर संबंधित व्यक्तींविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा, तसेच इतर संबंधित कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे. तपासादरम्यान या उद्योगामागे कोणाचा आशीर्वाद होता का, स्थानिक पातळीवर दुर्लक्ष झाले का, याचाही शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे, FDA मंत्र्यांच्या मतदारसंघातच इतक्या मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला तंबाखू उद्योग सुरू असल्याचे उघड झाल्याने, FDA यंत्रणेची कार्यक्षमता, स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि जबाबदारी यावर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकरणात आता वरच्या पातळीपर्यंत चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!