फलटणमध्ये भरारी कारवाई : 13 घरगुती गॅस सिलेंडर जप्त; मात्र गॅस एजन्सींवर कारवाईस टाळाटाळ?

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार राज्यातील इंधन पुरवठा साखळीवर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण तहसील व पुरवठा विभागाकडून तालुक्यात भरारी तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या पथकाकडून हॉटेल आस्थापना, चहाचे स्टॉल तसेच इतर व्यावसायिक ठिकाणांची अचानक तपासणी करण्यात येत आहे. व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार कारवाई करण्यात येईल, अशी सूचना यापूर्वी देण्यात आली होती.त्या अनुषंगाने दि. 16 मार्च 2026 रोजी कोळकी व फलटण शहर परिसरात अचानक धाडी टाकण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान व्यवसायासाठी वापरात असलेले 13 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.ही कारवाई तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पुरवठा निरीक्षक अश्विनी पोहरे, पुरवठा लिपीक अनिकेत केकाण, किरण चवरे तसेच शिपाई ओंकार गवारी यांनी सहकार्य केले.

मात्र या कारवाईनंतर एक प्रश्न उपस्थित होत आहे. हॉटेल व छोट्या व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा वापर होत असताना संबंधित गॅस एजन्सींमार्फत अशा सिलेंडरचा पुरवठा कसा झाला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई होत असताना गॅस एजन्सींवर मात्र कारवाईस टाळाटाळ होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!