महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनसाठा आणि पुरवठ्याबाबत देशभर सतर्कता असताना फलटण तालुक्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या वितरणात गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अधिकृत दरापेक्षा जास्त पैसे आकारून सिलेंडर देणे, तसेच ऑनलाइन बुकिंग करून पैसे भरूनही ग्राहकांना सिलेंडर न देता काळ्या बाजारात विक्री केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, अनेक ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने सिलेंडर बुक करून पैसे भरलेले असतानाही त्यांना अनेक दिवस सिलेंडर मिळत नाही. चौकशी केली असता संबंधित कंपनीच्या नोंदींमध्ये मात्र तो सिलेंडर ग्राहकांच्या पत्त्यावर “पोहोचविल्याचे” दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र तो सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचलेलाच नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हा सिलेंडर काळ्या बाजारात वळवला जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही गॅस एजन्सीशी संबंधित दलाल किंवा अनधिकृत व्यक्ती कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांना एजन्सीवर फिरवून आणतात. घरपोच सेवा उपलब्ध असूनही अनेकांना “सिलेंडर उपलब्ध नाही” असे सांगितले जाते. मात्र त्याचवेळी काही दलालांकडून जादा पैसे दिल्यास लगेच सिलेंडर उपलब्ध करून दिला जात असल्याचे आरोप समोर येत आहेत.ग्रामीण भागात परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी अधिकृत दरापेक्षा तब्बल ५०० ते १००० रुपये जास्त घेऊन सिलेंडर विकले जात असल्याची तक्रार होत आहे.
त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक फटका बसत असून स्वयंपाकासाठी गॅस मिळवणेही अवघड झाले आहे.या सर्व प्रकारांमुळे गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित एजन्सी, वितरण कर्मचारी आणि दलाल यांच्यातील साटेलोटे असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासन व पुरवठा विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या फलटण तालुक्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. अनेक नागरिकांनी ऑनलाइन बुकिंग करूनही त्यांचे सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याचे, तर काही प्रकरणांमध्ये बुकिंग झाल्यानंतरही “डिलिव्हर झाले” असे दाखवून सिलेंडर गायब होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे तालुक्यात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
ग्राहकांच्या मते, अधिकृत दराने सिलेंडर उपलब्ध न होता काही ठिकाणी जास्त दराने गॅस सिलेंडर विक्री होत असल्याची चर्चा आहे. अनेकांनी बुकिंग केल्यानंतरही आठवड्याभरापेक्षा जास्त काळ सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. काही नागरिकांना तर एजन्सीकडून “स्टॉक उपलब्ध नाही” असे सांगितले जात असताना दुसरीकडे सिलेंडर खुलेआम जास्त दराने विकले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकारामुळे सामान्य ग्राहकांचे हाल होत असून घरगुती स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन प्रणाली असतानाही असे प्रकार कसे घडत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात संबंधित गॅस एजन्सींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
तसेच बुकिंग केलेल्या प्रत्येक ग्राहकाला वेळेवर सिलेंडर मिळेल याची खात्री प्रशासनाने करावी.दरम्यान, तालुक्यातील पुरवठा विभागाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन तपास सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास जिल्हाधिकारी तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे सामूहिक तक्रार दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
परस्पर ग्राहकांचे सिलेंडर विक्री प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी ग्राहकांच्या मधून होत असून सिलेंडरची काळ्या बाजारात परस्पर विक्री करणाऱ्या एजन्सीचे परवाने रद्द करण्याची मागणी ग्राहकांच्या मधून होत आहे. ज्या ग्राहकांच्या बाबतीत असे प्रकार घडले आहेत त्यांनी लेखी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

