“शासन आपल्या दारी” अभियानात लोकांनी सहभाग नोंदवावा, अभियानामुळे वेळ आणि पैशाची बचत; तहसीलदार अनंत गुरव

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडलातील लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि समस्यांचा जागेवरच निपटारा व्हावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान पाटण तालुक्यात यशस्वीपणे राबवले जात असून त्याचा लोकांना चांगल्याप्रकारे फायदा तर होतच आहे,शिवाय त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.

यावेळी बोलता तहसीलदार अनंत गुरव म्हणाले, थेट वारस नोंद या उपक्रमामुळे अनेक वर्षाच्या तालुक्यात रखडलेल्या वारसांच्या नोंदी होवून त्यांना शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेता मिळत आहे.ज्यांच्या वारसनोंदी झालेल्या नाहीत अशा लोकांनी तात्काळ महसूल विभागाकडे अर्ज करुन आपल्या वारसनोंदी करुन घ्याव्यात.

पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची ७/१२ विषयक कामे प्राधान्याने घेतली जात आहेत.यामध्ये वारसनोंदी,तुकडा नोंदी कमी करणे,लक्ष्मी मुक्ती योजना,पाणंद व शेत रस्ते अतिक्रमणमुक्त करणे,सामाजिक अर्थ साहय योजना अंतर्गत विधवा, वृद्ध,निराधार,दिव्यांग यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांचे जीवन उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले तात्काळ देण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक विभागात हे अभियान यशस्वीपणे राबवले जात असुन प्रत्येक मंडलातील मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक ही योजना तळागळापर्यत पोहचवत असल्याने त्याचा जनतेला लाभ होत असून चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे सांगितले.

शासनाने राबवलेल्या शंभर दिवसीय कार्यक्रमुळे पाटण तालुक्यातील लोकांना त्याचा चांगला लाभ होत आहे. शासनाच्या असणाऱ्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहचत असल्याने लोकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहेत.

error: Content is protected !!