थरार! प्रत्यक्ष बिबट्याला समोर पाहून मुलीचा उडाला थरकाप; मुलगी थोडक्यात बचावली

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

ढेबेवाडी प्रतिनिधी – महेश जाधव

पाटण तालुक्यातील काढणे येथील शिद्रुकवाडी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास निकिता म्होपरेकर हिच्या घरासमोर भक्षाच्या शोधात आलेल्या बिबट्याशी तिचा प्रत्यक्ष सामना झाल्याची धक्कादायक घटना घडली. साक्षात समोर बिबट्या उभा असल्याचे पाहून मुलीचा अक्षरशः थरकाप उडाला; मात्र सुदैवाने ती या प्रसंगातून थोडक्यात बचावली.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता ही घरातील भांडी धुण्यासाठी अंगणात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक समोर दर्शन दिले. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर बिबट्याला पाहताच मुलगी भीतीने सुन्न झाली. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला आणि ती भीतीपोटी जागीच कोसळली.दरम्यान, घरातील लोक बाहेर येऊन आरडाओरडा करताच आणि नागरिकांची हालचाल वाढल्याचे पाहून बिबट्याने तेथून जवळच असलेल्या झाडीत पळ काढला.

या घटनेमुळे मुलीला मोठा मानसिक धक्का बसला असून तिला उपचारासाठी तळमावले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतात आणि घरांच्या अंगणात बिबट्यांचा वावर वाढल्याने लहान मुले व महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

वनविभागाने केवळ पाहणी न करता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!