फलटण- भांडणातून झालेल्या खून प्रकरणाचा अपघात भासवण्याचा प्रयत्न करून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणा-या दोन आरोपींना फलटण ग्रामीण पोलीसांनी खून प्रकरणात अटक केली असून याप्रकरणी दोन जणांचे विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार , सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा गावाच्या हद्दीत लोंढे वस्तीजवळ फलटण रोडवर गणेश बाळु मदने (वय – 40 वर्ष, रा. सस्तेवाडी, ता. फलटण) या व्यक्तीचा अपघातात जखमी होऊन मृत्यू झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय, फलटण यांच्याकडुन ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, अकस्मात मयत रजिस्टर नंबर 01/2026, भा. ना. सु. सं. 2023 चे कलम 194 अन्वये अकस्मात मयत नोंद दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी अकस्मात मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळावर रक्ताचे थारोळे दिसुन आले. परंतु मृत्यू झालेल्या गणेश बाळु मदने यांची मोटार सायकल साईड स्टॅण्डवर फलटणकडे तोंड करुन सुस्थितीत उभी असल्याचे व तिच्या स्विचलाच चावी असल्याचे पोलीसांना दिसुन आले. ही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीसांनी मृत्यू झालेल्या गणेश याच्या नातेवाईकांकडे विचारपुस केली. तेव्हा गणेश बाळु मदने यांचे शेतात काहीवेळापुर्वी ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीबरोबर भांडणे झाली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.
सदरची घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी घडली होती. फलटण ग्रामीण पोलीसांनी गोपनीय बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अवघ्या चार तासांमध्ये रोहन कैलास पवार (20 वर्ष, रा. सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा) व गणेश शंकर जाधव (वय 22 वर्ष, सध्या रा. C/O कैलास भिमराव पवार, सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा मुळ रा. कलिना, कुंचीकोरवीगल्ली नं. 07, विद्यानगरी, मुंबई 400098) या दोन आरोपींना परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 15/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 352, 351 (2), 3 ( 5 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ज्योती चव्हाण, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशिद, अमोल देशमुख व तुषार नलवडे यांनी सहभाग घेतला होता.

