पुरंदर प्रतिनिधी :- काळदरी ग्रामपंचायत मध्ये चालु असलेल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक दिवसापासून भोंगळ चालू आहे नागरिक या प्रकाराला प्रचंड वैतागलेले आहेत.

काळदरी हा दुर्गम भाग असुन या भागात सद्या अनेक वाडी वस्तीवर ९० टक्के पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक राहात आहेत. पाण्याची समस्या उन्हाळा चालू झाला की चालू होते व पावसाळ्यात गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याच्या टाक्या स्वच्छ न करणे, पाणी नियमित न सोडणे, सार्वजनिक दिवाबत्ती, ग्रामपंचायत मधील सुविधा वेळेवर न देणे, ग्रामसभा वेळेवर न घेणे असे प्रकार चालू आहेत.

अनेक समस्यांबाबत नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे लक्ष न देणे तसेच कोणतीही माहिती मागितली असता त्याला उत्तर न देणे व उडवाउडवीची उत्तरे देणे आणि वेळ अशीच पुढे ढकलून त्यांचा मनमानी कारभार हा गावातील काही ठरविक लोकांच्या सांगण्यावरून सुरु आहे.

काळदरी ग्रामपंचायतीचा कारभार हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतुदीनुसार चालत नाही. या ग्रामपंचायतीचे पाठीमागील ३ वर्षापासून लेखापरीक्षण झाले नाही. पाठीमागील ग्रामपंचायत रेकॉर्ड हे उपलब्ध नाही. विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, काही सदस्य हे काळदरी हद्दीमध्ये राहत नाहीत व काही महिला सदस्यांचे पती हे गावकीचा कारभार आपापल्या मर्जीप्रमाणे चालवत असुन कोणतीच कामे होत नाहीत.

या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करूनसुद्धा कोणतीच दखल ग्रामपंचायत घेत नाही. गावातील युवा सामजिक कार्यकर्ता आकाश उत्तम पिसाळ यांनी याविषयी गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ पंचायत समिती पुरंदर यांच्याशी संवाद साधून निवेदन दिले. आकाश पिसाळ यांनी जर १५ दिवसांत यावर योग्य तो निर्णय न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. गटविकास अधिकारी श्रीश्रीमाळ यांनी याबाबत समस्याचे निवारण करण्यात येईल व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.